पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रुपीनगर–सहयोगनगर परिसरातील वारंवार होणाऱ्या वीजखंडित समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सेक्टर २४ पॉवर हाऊसमधून स्वतंत्र (Dedicated Feeder Line) विद्युत वाहिनी मंजूर करून तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी नगरसेविका व प्रभाग अध्यक्षा शिवानी दादासाहेब नरळे यांनी महावितरणकडे केली आहे.
रुपीनगर व सहयोगनगर परिसरात वाढती लोकसंख्या, व्यापारी आस्थापना आणि लघुउद्योगांमुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्याच्या विद्युत वाहिनीवर अतिरिक्त भार पडत असल्याने नागरिकांना वारंवार वीजखंडित होणे, ट्रिपिंग, तांत्रिक बिघाड तसेच कमी-अधिक व्होल्टेजच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सेक्टर २४ पॉवर हाऊसमधून स्वतंत्र फीडर लाईन सुरू करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत दादासाहेब नरळे यांनी महावितरणच्या भोसरी विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तसेच परिसरातील वीजपुरवठ्याच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
महावितरण अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान स्वतंत्र विद्युत वाहिनीच्या कामाबाबत लवकर कार्यवाही करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे भविष्यात रुपीनगर–सहयोगनगर परिसरातील नागरिकांना सुरळीत व स्थिर वीजपुरवठा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या कामासाठी आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा सुरू असून, महावितरणचे कार्यकारी अभियंता विश्वनाथ लहाने, अभियंता महाजन, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण सरोदे तसेच गणेशनगर एमएसईबीचे कार्यकारी अभियंता बनसोडे यांच्याशीही चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
महावितरण प्रशासनाने नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन या कामाला प्राधान्य देत तातडीने प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील वारंवार होणाऱ्या वीजखंडित समस्येतून नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

